भरारी पथकाने जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावाने पळवले. अन् अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडले.
अमरावतीच्या दर्यापूर परिसरातील घटनेने उडाली खळबळ
दर्यापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेतली धाव.
अमरावती:- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ आणि बुकिंग कालावधी थेट 45 दिवसांवर गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा आणि वाढता काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महसूल विभागामार्फत धाडसत्र राबवले जात असले, तरी या कारवाई दरम्यान आता अधिकारी आणि ग्राहकांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यात तर एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, महसूल विभागाने जप्त केलेले गॅस सिलिंडर संतप्त ग्राहकांनीच पळवून नेल्याची घटना घडली आहे, ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमरावतीच्या दर्यापूर परिसरात महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर रोखण्यासाठी महसूल विभागाने अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील हॉटेल्सवर धडक कारवाई सुरू केली होती. या मोहिमेत अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणांहून घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. मात्र, ही कारवाई सुरू असतानाच तिथे स्थानिक नागरिकांचा मोठा जमाव जमला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली.
जमावाने केवळ कारवाईला विरोधच केला नाही, तर कर्तव्यावर असलेल्या महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. विशेष म्हणजे, संतप्त जमावाने कारवाईचे अधिकृत पंचनामे फाडून टाकले आणि सरकारी वाहनात जप्त करून ठेवलेले सिलिंडर बळजबरीने काढून पळवून नेले. भररस्त्यात सरकारी मुद्देमाल पळवल्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या गोंधळामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आता संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र सुमारे तासभर उलटूनही जप्त केलेले सिलिंडर पळवून नेणाऱ्यांपैकी कोणीही ते परत करण्यासाठी पुढे आले नाही. या बेजबाबदार कृत्याची गंभीर दखल घेत, नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध रितसर तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणून जप्त केलेला मुद्देमाल पळवणाऱ्या या व्यक्तींविरुद्ध आता पोलिस प्रशासनाकडून कठोर कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.
