“समृद्ध पंचायतराज”ची अहेरीत तालुक्यात धडाकेबाज मोहीम.
किस्टापूर (वेल) ग्रामपंचायतीत मूल्यमापन पथकाची पाहणी; ८ ग्रामपंचायतींच्या विकासकामांचा घेतला आढावा
अहेरी(गडचिरोली):– राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज” अभियानाला अहेरी तालुक्यात चांगलाच वेग आला असून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे सखोल मूल्यमापन सुरू झाले आहे. ग्रामीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि गावपातळीवरील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी गावागावांत धडक देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती महागाव येथील अधिकाऱ्यांचे पथक नुकतेच अहेरी तालुक्यात दाखल झाले. या पथकाने विशेषतः किस्टापूर (वेल) ग्रामपंचायत येथे भेट देत ग्रामविकासाशी संबंधित विविध योजनांची पाहणी केली. गावातील स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, शासकीय नोंदी, विकासकामांची अंमलबजावणी तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या पथकात पंचायत समिती महागावचे गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम, पंचायत विस्तार अधिकारी सुरेश चव्हाण, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) अशोक जाधव, कनिष्ठ अभियंता ओंकार टेकाळे, वैभव कवीशवर विस्तार अधिकारी (सांखिकी), गणेश मानकर विस्तार अधिकारी (कृषी) तसेच दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार निलेश नरवाडे यांचा समावेश होता.
पथकाने शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कार्यपद्धतीची तपासणी केली. यामध्ये विकास योजनांची अंमलबजावणी, ग्रामस्वच्छता, शिक्षण, पाणीपुरवठा, ग्रामविकास आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता या बाबींचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.
दरम्यान, गावातील शाळांनाही भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेत शिक्षण व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली.
अहेरी तालुक्यातील महागाव बु., मेडपल्ली, खमनचेरू, राजपूर (पॅच), किस्टापूर (वेल), देवलमारी, रेपणपल्ली आणि पेरमिली या ग्रामपंचायतींचा अभियानात समावेश करण्यात आला आहे.
या अभियानामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक व विकासाभिमुख वातावरण निर्माण होणार असून ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
