“एक संघ, एक गाव, एक जिद्द” — हेडरीत लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीगचा जल्लोषात शुभारंभ
16 गावांचे संघ मैदानात; ग्रामीण क्रिकेटला नवे व्यासपीठ, युवकांमध्ये उत्साहाची लाट
जनार्दन नल्लावार
तालुका प्रतिनिधी, एटापल्ली
हेडरी : ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि गावागावांतील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL) स्पर्धेचा मंगळवारी हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर उत्साहात शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळ्याला गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली असून संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.
एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश ग्रामीण युवकांमधील क्रिकेट कौशल्याला वाव देणे, तळागाळातील क्रीडा संस्कृती मजबूत करणे आणि गावागावांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणे हा आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. प्रभाकरन म्हणाले की, “लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून ग्रामीण प्रतिभा, सामुदायिक एकता आणि युवकांच्या स्वप्नांचा उत्सव आहे. या माध्यमातून युवकांना नवी दिशा देण्याचा आणि गावांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या भव्य उद्घाटन सोहळ्यात परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला पुरसलगोंदीचे उपसरपंच राकेश कौडा, उदेरा ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गोटा, विविध पोलीस अधिकारी, गाव पाटील व पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत एकूण 16 गावांचे संघ सहभागी झाले असून संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. 6 मेपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे होण्याची शक्यता असून परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
“आपलं गाव, आपले खेळ” तसेच “एक संघ, एक गाव, एक जिद्द” या प्रेरणादायी घोषणांनी उद्घाटन सोहळ्याला विशेष रंगत आणली. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
उद्घाटनाच्या दिवशी लॉयड्स क्रिकेट टीम आणि ऑल ग्रामीण इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळविण्यात आला. 6 षटकांच्या रंगतदार सामन्यात लॉयड्स संघाने दमदार विजय मिळवत उपस्थितांची दाद मिळविली.
लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीगमधील सर्व सामने एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळविण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील युवकांना संधी उपलब्ध करून देत क्रीडा क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणून एलव्हीपीएलकडे पाहिले जात आहे. सामुदायिक ऐक्य, युवा सक्षमीकरण आणि ग्रामीण क्रीडा विकासाचे प्रभावी प्रतीक म्हणून ही स्पर्धा उदयास येत असून लॉयड्सच्या सामाजिक बांधिलकीचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे.
