राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली वन विभागाची धडक कारवाई, वनजमिनीवरील अतिक्रमण हटवून जेसीबी फिरवली; भामरागड वनविभागाची तत्पर मोहीम
एटापल्ली : प्रतिनिधी
भामरागड वनविभागांतर्गत एटापल्ली वनपरिक्षेत्रातील वनजमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण वन विभागाने धडक कारवाई करत हटविले. एटापल्ली नियतक्षेत्रातील वनकक्ष क्रमांक 345 मध्ये दोन ठिकाणी तसेच कक्ष क्रमांक 348 मध्ये एका ठिकाणी शेती व घर बांधण्याच्या उद्देशाने वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.
वन विभागाने संबंधित अतिक्रमणधारकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र कोणतेही वैध दस्तऐवज सादर न झाल्याने वनाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत अतिक्रमण हटविले. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने वनजमिनीवरील बांधकामे व अतिक्रमण हटविण्यात आले.
वनसंपत्तीचे संरक्षण व वनक्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी विभागाकडून सातत्याने मोहिमा राबविल्या जात असून, बेकायदेशीर अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. शैलेश भिमा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्री. विवेक रामटेके यांच्या नेतृत्वात करण्यात आली. एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निर्मला खोब्रागडे यांच्यासह वन कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक स्तरावर या कारवाईची चर्चा सुरू असून, वनजमिनींचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन आणखी कठोर पावले उचलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
