*कोरची तालुक्यात महाविस्तार AI ॲपची प्रचार-प्रसिद्धी*
*शाळा-कॉलेजमध्ये थेट भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल; शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद देण्याचा संकल्प*
*कोरची. :- जितेंद्र सहारे*
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या वतीने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाविस्तार AI ॲपचा प्रचार-प्रसिद्धी कार्यक्रम आज यशस्वीरीत्या पार पडला. हे कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सोबतच उपकृषी अधिकारी ईश्वरदयाल पाथोडे यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, बाजारभाव, शासकीय योजना आदी बाबींची तात्काळ व अचूक माहिती एकाच ॲपमध्ये मिळावी या उद्देशाने विकसित करण्यात आलेले महाविस्तार AI ॲप आता गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातही पोहोचत आहे. या ॲपद्वारे शेतकरी आपल्या शेताच्या फोटोच्या आधारे पीक ओळख, रोगनिदान व उपाययोजना त्वरित मिळवू शकतात. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने वैयक्तिक सल्ला व मार्गदर्शनही उपलब्ध होते.
या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आज कोरची येथील शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कोरची येथे कृषी विभागाच्या टीमने प्रत्यक्ष भेटी दिल्या. तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ व उपकृषी अधिकारी ईश्वरदयाल पाथोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मोबाईलमध्ये महाविस्तार AI ॲप थेट इन्स्टॉल करून दिले. ॲपची वैशिष्ट्ये, वापर पद्धती व शेतकऱ्यांसाठी असलेले फायदे यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
नागेश मिसाळ म्हणाले,
“आजचे विद्यार्थी उद्या शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे वारसदार असतील. त्यांना लहानपणापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे गरजेचे आहे. महाविस्तार AI ॲप हे केवळ एक ॲप नाही तर शेतकऱ्यांचे डिजिटल साथीदार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे ॲप प्रभावीपणे वापरता यावे यासाठी आम्ही शाळा-कॉलेजांपासून ते गावपातळीपर्यंत जनजागृती करीत आहोत.”
उपकृषी अधिकारी ईश्वरदयाल पाथोडे यांनी विद्यार्थ्यांना ॲपचे डेमो दाखवताना सांगितले की, “हे ॲप मराठीसह इंग्रजी व इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. आवाजाच्या (व्हॉईस) माध्यमातूनही प्रश्न विचारता येतो, त्यामुळे निरक्षर शेतकऱ्यांनाही ते सोपे आहे.”
या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करण्यात आले. येत्या काही दिवसांत कोरची तालुक्यातील सर्व गावांमध्ये शेतकरी सभा, ग्रामपंचायत बैठका व शेतकरी गटांच्या माध्यमातूनही हे ॲप पोहोचवले जाणार आहे.
शेतकऱ्यांना डिजिटल साक्षर करून त्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महाविस्तार AI ॲप ही खऱ्या अर्थाने क्रांतिकारी पावले उचलत आहे, असे मत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
