*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोरची येथे प्रवेश पूर्व परीक्षा उत्साहात संपन्न; ३४० विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग*
*कोरची* : एकलव्य आदर्श निवासी विद्यालय (EMRS) कोरची येथे इयत्ता सहावी ते नववी प्रवेशासाठी घेण्यात आलेली प्रवेश पूर्व परीक्षा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे आपली वाटचाल दृढ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी ९८ मुले व ९५ मुली असे एकूण १९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता सातवीसाठी २० मुले व ३४ मुली असे एकूण ५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. इयत्ता आठवीसाठी २६ मुले व ३२ मुली असे एकूण ५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता नववीसाठी १३ मुले व २२ मुली असे एकूण ३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
अशा प्रकारे इयत्ता सहावी ते नववी या वर्गांसाठी एकूण १५७ मुले व १८३ मुली असे मिळून ३४० विद्यार्थ्यांनी कोरची येथील परीक्षा केंद्रावर उपस्थिती लावली. मुलींची लक्षणीय उपस्थिती ही शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे द्योतक ठरली.
परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून एकलव्य विद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र सिंह ठाकुर यांनी संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडले. परीक्षेच्या पारदर्शकतेची खात्री करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (APO) नरेंद्र दादाजी कावळे यांनी परीक्षा केंद्रास भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले. कोरची पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून दिल्याबद्दल प्राचार्य धर्मेंद्रसिंह ठाकुर यांनी त्यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुयोग्य आसनव्यवस्था, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा, मार्गदर्शन व्यवस्था तसेच शिस्तबद्ध देखरेख यांची योग्य काळजी घेण्यात आली होती. परीक्षा केंद्रप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शांततामय व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.
एकलव्य आदर्श निवासी विद्यालय, कोरची येथे झालेली ही प्रवेश पूर्व परीक्षा यशस्वी ठरून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्याचा पाया अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहे.
