नोकरीच्या आमिषाने शहीद जवानांच्या कुटुंबाची 2.16 कोटींची फसवणूक; आरोपी 24 तासांत जेरबंद
• मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून वर्ग-1 पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष
• गडचिरोली पोलिसांची जलद कारवाई; पुणे जिल्ह्यातून आरोपीला अटक
गडचिरोली : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शहीद जवानांच्या कुटुंबाकडून तब्बल 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असताना सन 2013 मध्ये तोडगट्टा जंगल परिसरात झालेल्या पोलीस-माओवादी चकमकीत पोलीस अंमलदार गणपत नेहरू मडावी शहीद झाले होते. शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा सागर गणपत मडावी याने वर्ग-1 पदासाठी अर्ज केला होता.
दरम्यान, सन 2022 मध्ये पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सागर मडावी याची ओळख ज्ञानेश्वर शिवाजी वरे (वय 30, रा. वरोडी खुर्द, ता. भोर, जि. पुणे) याच्याशी झाली. वरे याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत अनुकंपा तत्त्वावर उपजिल्हाधिकारी (वर्ग-1) पदाची नियुक्ती करून देण्याचे आश्वासन दिले.
यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगून वरे याने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने सागर मडावी व त्यांची आई मीना गणपत मडावी यांच्याकडून वेळोवेळी रोख, फोन-पे तसेच एटीएमद्वारे एकूण 2,16,79,100 रुपये उकळले.
या प्रकरणी 20 एप्रिल 2026 रोजी सागर मडावी यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा क्र. 469/2026 अंतर्गत कलम 318(4) व 3(5) नुसार ज्ञानेश्वर वरे व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. समाधान दौड व गडचिरोलीचे सपोनि. विजय मुसनवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोस्टे राजगड, जि. पुणे हद्दीतून आरोपी ज्ञानेश्वर वरे याला ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील इतर चार फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सपोनि. विजय मुसनवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
