राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय, गट्टा येथे भव्य हस्तकला प्रदर्शन उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ; पर्यावरणपूरक वस्तू, विज्ञान मॉडेल्ससह विविध कलाकृतींचे सादरीकरण
एटापल्ली (प्रतिनिधी) :
एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी भव्य हस्तकला प्रदर्शन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला आदिवासी विविध सहकारी मंडळ, नाशिकचे संचालक सैनुजी गोटा, एटापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, शाळेचे मुख्याध्यापक एम. सी. बेडके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शहा, ग्रामसेवक मनोज मेश्राम (गट्टा), ग्रामसेवक पंधरे (गर्देवाडा), मंडळ अधिकारी रामटेके, तलाठी राहुल मेश्राम तसेच परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण करून त्यांचे कौतुक केले.
या हस्तकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आकर्षक स्टॉलच्या माध्यमातून सादर केल्या. पर्यावरणपूरक वस्तू, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू, विज्ञानाशी संबंधित मॉडेल्स तसेच दैनंदिन उपयोगातील वस्तूंनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या कलाकृतींबाबत माहिती देत उपस्थितांना प्रभावित केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा सर्जनशील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एम. सी. बेडके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. यात टेकाम सर, दुर्वे सर, नारोटे सर, उईके मॅडम, धोटे मॅडम तसेच समा कवडो, सुधीर बोडगेलवार, दीपा रंगुवार आणि प्रतिभा कुलमेथे यांनी मोलाचे सहकार्य केले.
या भव्य हस्तकला प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळाली असून गावात शैक्षणिक व सर्जनशील वातावरण अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि नवकल्पना विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे स्पष्ट झाले.
