भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे वनहक्क पट्टा मार्गदर्शन मेळाव्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
वनविभाग–महसूल विभागाची संयुक्त उपस्थिती.
भामरागड(गडचिरोली):- तालुक्यातील ताडगाव येथे दि. 6 डिसेंबर रोजी माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशानुसार वनहक्क पट्टे समस्या संदर्भात भव्य मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ताडगाव तसेच परिसरातील शेकडो नागरिकांनी मेळाव्यास मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास लक्ष्मण येर्रावार अहेरी विधानसभा प्रमुख (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस), इंदरशहा मडावी तालुकाध्यक्ष भामरागड, लालसु आत्राम कार्यकारी अध्यक्ष, रमेश मारगोनवार जिल्हा समन्वयक, सबरबेग मोगल आदिवासी सेवक यांसह वनविभागाचे कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी आणि गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मेळाव्यात वनहक्क कायदा 2006 अंतर्गत नागरिकांना मिळणारे हक्क, प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, वनजमिनीवरील हक्कांची पडताळणी, शासकीय विभागांमधील समन्वय आणि दावा–हरकतींची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी वनहक्काबाबतच्या विविध शंका समस्यावर प्रत्यक्ष अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळविली.
बहुसंख्य अतिक्रमण धारकांनी वनहक्क पट्टे प्रक्रियेबाबत दाखवलेला उत्साह उल्लेखनीय होता. या मेळाव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पात्र नागरिकांना त्यांच्या हक्कांची मिळणारी नवी आशा निर्माण झाली आहे.
मेळाव्यात मान्यवरांनी भाषणातून सांगितले की, माजी मंत्री तथा आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी आणि ग्रामीण जनतेच्या हक्कांसाठी निर्णायक पावले उचलली जात आहेत. “वनहक्क हा जनतेचा संविधानिक अधिकार असून, प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत शासनाची मदत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ताडगावात झालेला हा मेळावा वनहक्क जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
