शासकीय निधीची वाट न बघता वेडमपल्ली वासियांनी श्रमदानातून तयार केला तीन किलोमिटरचा पांदन रस्ता.
अहेरी(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत मेडपल्लीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी होत ग्रामविकासाच्या एक नवा आदर्श घडवून दिला आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या या अभियानाच्या मुख्य हेतू लोकसहभाग व श्रमदानातून गावाचे सर्वांगीण विकास करणे , ग्रामपंचायतींना बळकट करणे आणि मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर आहे. त्याच अनुषंगाने अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत मेडपल्ली अंतर्गत मौजा वेडमपल्ली गावकऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत आवश्यक असा 3 कि. मी. पांदन रस्ता निर्माण केला.
ग्रामपंचायत मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी यांनी वेडमपल्ली गावकऱ्यांना अभियानातून लोकसहभाग व श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत रस्त्याचे उपयोग, वाहतुकीला सुलभता, शेतकऱ्यांना होणारा फायदा, या सर्व बाबी बद्दल माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनानी सदर अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकसहभाग व श्रमदान करून 3 कि. मी. पांदन रस्ता तयार करण्यास हातभार लावला. कामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत महिला,पुरुष, युवक, युवतीनीं हातात कुंदळ, फावडे, घमेला घेत उपस्थिती दाखवली. रस्त्याचे समतलीकरण, माती भरणे, दगड हटविणे, व पृष्ठभाग मजबूत करणे या सर्व कामांमध्ये ग्रामस्थानांनी एकजुटीने सहभाग घेतला.
या उपक्रमात गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी श्रमदान करून गाव विकासात वास्तविक सहभाग नोंदविला. ग्रामीण भागात विकासाच्या कामासाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या सहभागातून परिवर्तन घडवून आणण्याचे वेडमपल्लीचे उदाहरण प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या हेतू गावकऱ्यांच्या सहभागातून सशक्त स्वावलंबी व सुविधा युक्त ग्रामपंचायत निर्माण करणे हा आहे. आणि ग्रामपंचायत मेडपल्ली अंतर्गत वेडमपल्लीने या ध्येयाची ठोस अंमलबजावणी करत सहभागी विकासाच्या उत्कृष्ट नमुना मांडला आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायत मेडपलीचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. मडावी, ग्रामपंचायत सदस्य विलास वेलादी, गाव पाटील लक्ष्मण गावडे, ग्रामकोष समिती अध्यक्ष संजय वेलादी, सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती सचिव अविनाश कुमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू वेलादी, ग्रामपंचायत कर्मचारी विश्वनाथ मडावी आदी पदाधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या उपक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्याने सहभाग नोंदवून सहकार्य केले.
