हेडरीतील एलकेएएम रुग्णालयाचा नवा विक्रम; पहिली वेदनारहित प्रसूती यशस्वी, ४०० व्या सुरक्षित बाळाचा जन्म
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्गम आदिवासी भागात उच्च दर्जाची मातृत्व सेवा
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सकारात्मक चित्र समोर येत आहे. हेदरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने नुकतेच दोन महत्त्वाचे टप्पे गाठत आरोग्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिल्ह्यातील पहिली ‘वेदनारहित सामान्य प्रसूती’ यशस्वीरीत्या पार पडली असून याचसोबत ४०० व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा ऐतिहासिक टप्पाही पूर्ण करण्यात आला आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागात प्रसूतीदरम्यान महिलांना तीव्र वेदनांना सामोरे जावे लागते. मात्र एलकेएएम रुग्णालयाने ‘एपिड्युरल अॅनेस्थेशिया’ या आधुनिक पद्धतीचा वापर करून वेदनारहित प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत प्रसूतीच्या कळा जाणवत नाहीत, परंतु माता पूर्णपणे शुद्धीवर राहते. ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडली.
या प्रसूतीदरम्यान ‘वाय-फाय सक्षम CTG मॉनिटरिंग’ तसेच ‘डिलेयड कॉर्ड क्लॅम्पिंग’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या वैद्यकीय पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यामुळे आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णालयाने ४०० व्या सुरक्षित प्रसूतीचा महत्त्वपूर्ण टप्पा देखील गाठला. गार्डेवाडा येथील १९ वर्षीय सविता टोप्पो या गर्भवती महिलेला उच्च-जोखीम गर्भधारणा असल्यामुळे गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तातडीने एलकेएएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांच्या तज्ज्ञ पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले आणि १५ एप्रिल २०२६ रोजी तिच्या बाळाचा सुरक्षित जन्म घडवून आणला.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या ‘सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्ती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे रुग्णांना संवेदनशील आणि दर्जेदार सेवा दिली जात आहे.
रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, “हेडरीसारख्या दुर्गम भागात वेदनारहित प्रसूती आणि ४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा गाठणे हे आमच्या आरोग्यसेवेच्या समर्पणाचे प्रतीक आहे. आता आदिवासी भागातील मातांना प्रसूतीसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरलेली नाही.”
या यशामुळे अहेरी, एटापल्ली आणि भामरागड परिसरातील नागरिकांमध्ये रुग्णालयाविषयी विश्वास वाढला असून ग्रामीण भारतातील मातृत्व सेवेला या निमित्ताने नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.
