धोबाटोला येथे बार सुरू करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध; खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आंदोलनस्थळी भेट देत दिले आश्वासन
गावातील शांतता व सामाजिक वातावरण बिघडू नये म्हणून ग्रामस्थांचे धरणे आंदोलन
देवरी (जि. गोंदिया) :
ता. देवरी अंतर्गत ग्रामपंचायत उचेपूरच्या धोबाटोला येथे गावामध्ये बार सुरू करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. गावातील सामाजिक वातावरण बिघडू नये, युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढू नये तसेच गावाची शांतता अबाधित राहावी या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी काही दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गावकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत Dr. Namdev Kirsan, खासदार, Gadchiroli–Chimur Lok Sabha constituency, यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या व कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडू न देता ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून योग्य व कायदेशीर पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
गावातील महिलांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी बार सुरू करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवित प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या उषाताई सहारे, पंचायत समिती सदस्य रंजीत कासम, पंचायत समिती सदस्या भारतीताई सलामे, पंचायत समिती सदस्या अनुसयाताई सलामे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चांदेवार, नरेंद्र सांडिल, चैनसिंगजी मडावी, सावंत बापू राऊत, प्रदीप देशमुख, उत्तम साखरे, दिगंबर चौधरी, डॉ. चौधरी, राजेश अंबादे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
