*सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रामेश्वर नाईक यांची समन्वयकपदी नियुक्ती; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव…
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे विश्वासू सहकारी व निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले रामेश्वर नाईक यांची सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ही नियुक्ती त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि प्रशासकीय अनुभवाची पावती मानली जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. या भव्य आयोजनात कोट्यवधी भाविक, विविध आखाडे, संत-महंत, सामाजिक संस्था तसेच अनेक शासकीय विभाग सहभागी होत असतात. अशा व्यापक आणि बहुआयामी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम समन्वयकाची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर रामेश्वर नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या संघटन कौशल्यावर आणि नेतृत्वक्षमतेवर शासनाने दाखविलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.
राज्य प्रशासनात विविध स्तरांवर कार्य करताना रामेश्वर नाईक यांनी सातत्याने उत्कृष्ट समन्वय, नियोजन आणि कार्यतत्परतेचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजनात निश्चितच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अधिक भव्य, दिव्य, सुव्यवस्थित आणि ऐतिहासिक ठरेल, अशी अपेक्षा भाविकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
यावेळी गोपाल साबळे, माजी सरपंच,व बंजारा बाधव समाज यांनी रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, “सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यासाठी समन्वयक म्हणून झालेली नियुक्ती ही संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल, असा विश्वास आहे.”
रामेश्वर नाईक यांच्या या नियुक्तीबद्दल चामोर्शी तालुक्यासह विविध भागांतून त्यांचे स्वागत करण्यात येत असून, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या यशस्वी आयोजनासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
