शिक्षण क्षेत्रातील ३४ वर्षांच्या समर्पित सेवेला सलाम!
राजे धर्मराव विद्यालयात गणित शिक्षक सुधीर फरकाडे यांचा सपत्नीक भावपूर्ण सत्कार
शिस्त, वेळेचे भान आणि विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव

आष्टी (प्रतिनिधी) :
येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ गणित शिक्षक सुधीर फरकाडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तब्बल ३४ वर्षे प्रामाणिक, शिस्तबद्ध व निष्ठेने शैक्षणिक सेवा बजावणाऱ्या फरकाडे यांच्या कार्याचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रविंद्र ठाकरे होते. यावेळी व्यासपीठावर सुधीर फरकाडे यांच्या पत्नी प्रज्ञा फरकाडे, मुलगा अथर्व फरकाडे, भगिनी शांताबाई बेलसरे, शुभांगी बेलसरे, सेवानिवृत्त प्रा. नारायण सालूरकर, भास्कर बामनकर, एस. जे. ठेंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, सुधीर फरकाडे यांनी धर्मराव शिक्षण मंडळात ३४ वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली. वेळेचे काटेकोर पालन, शिस्तप्रियता, संयमी स्वभाव आणि नियमांच्या चौकटीत राहून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, अभ्यासाची आवड आणि जीवनमूल्ये रुजविण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम कायम प्रेरणादायी राहतील. संस्थेप्रती त्यांची निष्ठा व समर्पण भावी शिक्षकांसाठी आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
याप्रसंगी प्रा. सुनील धोंगडे, एस. एम. दास, प्रा. त्रिशीला झाडे आणि भास्कर बामणकर यांनी मनोगत व्यक्त करून फरकाडे यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत झाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. एन. यावले यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
