दारव्हा तालुक्यात बनावट बियाणे विक्रीप्रकरणी मनसे आक्रमक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, मोफत बियाणे व कृषी केंद्रांवर तात्काळ कारवाईची मागणी
दारव्हा(यवतमाळ):– दारव्हा तालुक्यात कृषी केंद्र चालकांकडून बनावट बियाण्यांची विक्री, खत व फवारणी औषधांची सक्ती (लिंकिंग), तसेच आर्थिक फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. दोषी कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष लाला शिवचरण पांडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यात अनेक कृषी केंद्रांमधून शासनाने बंदी घातलेले किंवा निकृष्ट दर्जाचे बनावट बियाणे शेतकऱ्यांना विकण्यात आले. या बियाण्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी किंवा पूर्णपणे शून्य असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीच उगवली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, या प्रकारामुळे तालुक्यातील सुमारे ५० टक्के शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक कृषी केंद्रांमध्ये स्टॉक रजिस्टर अद्ययावत ठेवले जात नसल्याचा तसेच दुकानाबाहेर दरपत्रक न लावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मनसेने खत व फवारणी औषधांच्या सक्तीच्या विक्रीचाही मुद्दा उपस्थित केला आहे. शेतकरी आवश्यक खत किंवा औषध घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सन २०२२ मध्ये तालुक्यात बनावट बियाण्यांवर कारवाई झाल्याचा दाखला देत, यंदाही कृषी विभागाने तातडीने तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मनसेच्या प्रमुख मागण्या :
🌟तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांची तात्काळ तपासणी करून बियाणे व खतांचे पंचनामे करावेत.
🌟बनावट बियाणे विक्री, लिंकिंग आणि नियमभंग करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करावेत.
🌟फसवणुकीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई द्यावी.
🌟दुबार पेरणीसाठी शासनामार्फत मोफत बियाण्यांचा पुरवठा करावा.
मनसेने इशारा दिला आहे की, कृषी विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई न केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेशराव सुकळे, तालुकाध्यक्ष लाला शिवचरण पांडे यांच्यासह ईश्वर राठोड, रणजित झोंबाडे, विशाल चव्हाण, अशोक जोगदंड, गोपाल हिवराळे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
