पिकलेल्या पपईवर ‘उडता सोनसर्प’चा ताव; शेतकऱ्याची सतर्कता, मोठा अनर्थ टळला!
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील कोडसेलगुडम मधील घटना.
पावसाळ्यात झाडावरील फळे तोडताना व खाताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन.
अहेरी (गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील पेरमिली गावातील कोडसेलगुडम येथे एका शेतकऱ्याच्या घरासमोरील पपईच्या झाडावर ‘उडता सोनसर्प’ (Ornate Flying Snake/वेल्या साप) आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सुमारे २० फूट उंच असलेल्या पपईच्या झाडाला अनेक पपया लागल्या होते. त्यापैकी दोन पपया पूर्णपणे पिकल्या होत्या. त्या तोडण्यासाठी शेतकरी झाडाजवळ गेला असता, पिकलेल्या पपईंच्या घोसात उडता सोनसर्प लपून बसलेला दिसून आला. विशेष म्हणजे हा साप पिकलेल्या पपईजवळ बसून त्याचा आस्वाद घेत असल्याचे दिसून आले. शेतकऱ्याने वेळीच साप पाहिल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
जर साप न पाहता पपई तोडण्याचा प्रयत्न केला असता, तर घाबरलेल्या सापाकडून चावा घेण्याची शक्यता नाकारता आली नसती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळ्यात झाडावरील फळे तोडताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
उडता सोनसर्प म्हणजे काय?
उडता सोनसर्प किंवा वेल्या साप हा झाडांवर राहणारा अतिशय चपळ व देखणा साप आहे. हा साप प्रत्यक्षात उडत नसला तरी शरीर सपाट करून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हवेत घसरत (Glide) जात असल्यामुळे त्याला ‘उडता साप’ असे संबोधले जाते. त्याचा रंग हिरवट, पिवळसर किंवा काळ्या नक्षीचा असल्याने तो झाडांच्या पानांमध्ये सहज मिसळून जातो आणि पटकन नजरेस पडत नाही. हा साप प्रामुख्याने सरडे, बेडूक, लहान पक्षी व त्यांची अंडी यांवर उपजीविका करतो. सामान्यतः तो माणसांवर हल्ला करत नाही; मात्र धोका जाणवल्यास चावा घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सापाला हाताळण्याचा प्रयत्न करू नये.
वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये पावसाळ्यात सापांचा वावर वाढत असल्याने पपईसह इतर झाडावरील फळे तोडण्यापूर्वी फळांचे घोस, फांद्या आणि दाट पानांची काळजीपूर्वक पाहणी करावी. झाडांवर साप राहत असल्याने फळांवर काळे डाग, दातासारख्या खुणा किंवा संशयास्पद चिन्हे आढळल्यास अशी फळे खाणे टाळावे. कोणतेही फळ तोडल्यानंतर ते नीट निरखून पाहावे आणि सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच त्याचे सेवन करावे. तसेच साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता वन विभाग किंवा स्थानिक सर्पमित्रांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोडसेलगुडम येथील या घटनेने पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात काम करणाऱ्या शेतकरी व नागरिकांसाठी सतर्कतेचा महत्त्वाचा इशारा दिला आहे. झाडावरील फळे तोडताना आणि खाताना थोडीशी खबरदारी घेतल्यास मोठा अनर्थ टाळता येऊ शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
