वसंतराव कुलसंगे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर सत्कार
क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ध्येयवेड्या कार्यकर्त्याचा गौरव; विविध सामाजिक संघटनांची उपस्थिती
गडचिरोली, प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी, इतिहास संवर्धन आणि जनजागृतीच्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणारे वीर बाबुराव स्मारक समितीचे संस्थापक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कुलसंगे यांच्या अमृतमहोत्सवी (७५ व्या) वर्षानिमित्त शनिवारी चांदेकर भवन येथे विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती वसंतराव कुलसंगे यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी पौर्णिमा कुलसंगे यांचा शाल, पुष्पगुच्छ तसेच साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर केक कापून त्यांचा वाढदिवसही आनंदोत्सवात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रकाश अर्जुनवार (गांधी विचार मंच), गुलाबराव मडावी (बाबुराव मडावी स्मारक समिती), मनोहर हेपट (जन अधिकार मंच), गौतम मेश्राम (संविधान फाऊंडेशन), कर्मचारी संघटनेचे नेते देवानंद फुलझेले, महाअंनिसचे विठ्ठलराव कोठारे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते व संशोधक डॉ. सुशील कोहाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात वसंतराव कुलसंगे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना ध्येयवेडा, निस्वार्थ आणि समाजाभिमुख कार्यकर्ता असे संबोधले. विशेषतः क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्याचा इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेले योगदान मोलाचे असून, इतिहास संवर्धनाची त्यांनी उभारलेली चळवळ भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला हंसराज उंदिरवाडे, कुणाल कोवे, अमरसिंग गेडाम, मनोहर अमनपटलावार, उपेंद्र रोहणकर, प्रदीप भैसारे, निशा कुमरे, कवडूजी उंदिरवाडे, हरिदास कोटरंगे, वर्षा राजगडे, देवराव आलाम, निलकंठ कुमरे, विजय देवतळे, वासुदेव कन्नाके, हर्षवर्धन कुलसंगे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विलास निंबोरकर यांनी केले, तर गौतम मेश्राम यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमात वसंतराव कुलसंगे यांच्या कार्याचा गौरव करणारे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक योगदानाला उत्स्फूर्त दाद दिली.
