बामणपेठ जंगल मार्गावर थरार! विवाहितेवर धारदार शस्त्राने सपासप वार; पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
घरी सोडण्यासाठी जात असताना दुचाकीला धक्का देत हल्ला; आष्टी पोलिसांची तातडीची कारवाई, आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा
आष्टी, दि. 28 (प्रतिनिधी) :
चामोर्शी तालुक्यातील बामणपेठ गावाजवळील जंगल मार्गावर रविवारी (दि. 28 जून) सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास एका विवाहितेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरिदास अमल गाईन (वय 25, रा. लगाम, ता. मूलचेरा) हा त्याची आतेबहीण कनिका ब्रजकेश दास ऊर्फ कनिका विश्वजीत मंडल (वय 28, रा. विकासपल्ली, ह.मु. ठाकूरनगर) हिला तिच्या दोन लहान मुलांसह घरी सोडण्यासाठी दुचाकीने जात होता. दरम्यान, बामणपेठ गावाजवळील जंगल रस्त्यावर आरोपी ब्रजकेश ठाकूर दास (वय 34, रा. विकासपल्ली) याने दुचाकीला पायाने धक्का मारून त्यांना अडविले.
यानंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि धारदार शस्त्राने कनिका हिच्या पोटावर, मानेवर, दोन्ही हातांवर तसेच दोन्ही पायांवर सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली.
फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 183/2026 नुसार कलम 109(1), 296, 351(3) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन मुकुंदराव मस्के करीत आहेत. गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार जमिल कदीर शेख यांनी केली असून पोलीस निरीक्षक विशाल प्रकाशराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
