हरवलेले मोबाईल शोधून मालकांच्या हाती; आष्टी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मोहीमेद्वारे सुमारे 71 हजार 996 रुपयांचे चार मोबाईल परत
आष्टी : गडचिरोली जिल्ह्यात हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी दिले होते. त्या अनुषंगाने मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी तसेच मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले मोबाईल शोधून काढले.
पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोशि/6065 प्रमोद पेटकुले व मपोशी/2221 नेहा नैताम यांनी तक्रारींची तपासणी करून हरवलेले मोबाईल शोधून काढले. शोध मोहिमेदरम्यान चार मोबाईल हस्तगत करण्यात आले असून ते आज दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
परत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये प्रभाश सरकार यांचा OnePlus Nord CE4 (₹24,999), साजन दिलीप बांबोडे यांचा OnePlus Nord CE3 (₹20,999), धिराक्श शेडमाके यांचा Realme C67 (₹13,999) आणि मुकेश साना यांचा Realme C55 (₹11,999) या मोबाईलचा समावेश आहे. या सर्व मोबाईलची एकूण किंमत सुमारे ₹71,996 इतकी आहे.
हरवलेली मालमत्ता परत मिळाल्याने मोबाईलधारकांनी आष्टी पोलिसांचे आभार व्यक्त केले. पोलिसांनी केलेल्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
