पावसाळ्यापूर्वी मूल–हरणघाट मार्गाचे काम पूर्ण करा; युवक काँग्रेस अध्यक्ष विलास चीचघरे यांची मागणी
अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज
मूल प्रतिनिधी : मूल–हरणघाट मार्गावरील नवीन रस्त्याचे बांधकाम सध्या सुरू असले तरी अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी या मार्गाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विलास चीचघरे यांनी केली आहे.
सध्या या मार्गावर काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले असून काही भागात केवळ मुरूम टाकून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दररोज प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीचे प्रमाण वाढल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून रस्त्यावरील खड्डे आणि असमतल भागांमुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने अपूर्ण रस्त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल साचून वाहतूक विस्कळीत होऊ शकते तसेच नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होऊ शकतो.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास चीचघरे यांनी संबंधित बांधकाम विभाग आणि प्रशासनाचे लक्ष वेधत सांगितले की, मूल–हरणघाट मार्ग हा परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होतील. अन्यथा नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.
परिसरातील नागरिकांनी देखील प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
