आरटीई प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकारांची चौकशी करा – पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
खोट्या कागदपत्रांवर प्रवेश घेतलेल्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
ब
आरटीई (Right to Education) अंतर्गत शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखून नियमांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेतलेल्या पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पालकांनी केली आहे. यासंदर्भात आज माननीय शिक्षणाधिकारी तसेच तालुका गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही पालकांनी बनावट किंवा चुकीची कागदपत्रे सादर करून प्रवेश घेतल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली. त्यामुळे लागलेल्या यादीनुसार सर्व प्रवेशांची संपूर्ण व नियमबाह्य चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करूनच आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात यावा, यासाठी प्रत्यक्ष मौका पंचनामा करून तपास करावा, अशीही मागणी करण्यात आली. येत्या पंधरा दिवसांत या संदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी सामाजिक युवा कार्यकर्ते तसेच आरटीई प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी करणारे अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
