एटलापल्ली वनपरिक्षेत्रात अतिक्रमणावर कारवाई; वनविभागाची मोहीम यशस्वी
नियमबाह्य रित्या सुरू असलेला एटापल्ली – कसनसूर रोडच्या डेपोमधील अतिक्रमण हटविला
राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या एटलापल्ली वनपरिक्षेत्रातील एटलापल्ली नियतक्षेत्रात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या कसनसूर रोडला लागून असलेल्या वनविभागाचा अखत्यारीत विक्री डेपो असून सदर विक्री डेपोमध्ये स्थानिकांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले असल्याने वनविभागाने कारवाई करत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान वनजमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले.
वनविभागाने यापूर्वी अतिक्रमण धारकांना वारंवार नोटीस देऊन आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली होती. मात्र, संबंधितांकडून कोणतेही वैध पुरावे सादर न केल्यामुळे वनविभागाने नियमानुसार कारवाई करत सदर अतिक्रमण हटविले.
ही कारवाई भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. शैलेश मिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्री. डी. जी. रामटेके आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एन. के. खोब्रागडे यांच्या उपस्थितीत एटापल्ली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
वनजमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी वनविभागाकडून भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
