*चामोर्शी येथे सार्वजनिक शिव-भिम जयंती प्रबोधनात्मक महोत्सव उत्साहात संपन्न*..
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी : शहरातील सामाजिक ऐक्य, विचारप्रबोधन आणि संत-समाजसुधारकांच्या कार्याचा जागर जागर करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक शिव-भिम जयंती प्रबोधनात्मक महोत्सवाचे आयोजन नगरपंचायतीच्या बाजार चौकातील प्रांगणात मोठ्या उत्साहात करण्यात आले. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा महोत्सव दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब हे होते. उद्घाटक म्हणून नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर उच्च न्यायालय, संभाजीनगर येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. वैशाली डोळस यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि न्याय या विषयांवर सखोल विवेचन केले. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक अमोल गण्यारपवार व न.प. सभापती रोशनीताई वरघंटे उपस्थित होत्या.
मागील ११ वर्षांपासून सातत्याने हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षी विविध नामवंत वक्ते, कीर्तनकार व समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. यंदाही संत आणि समाजसुधारकांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंचावरील वक्त्यांनी संत तुकाराम महाराज, संत रोहिदास महाराज, संत गाडगेबाबा तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांचा आजच्या समाजजीवनात कसा उपयोग होऊ शकतो, याबाबत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भारती तितरे मॅडम यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक कविता झाडे यांनी केले.तर आभारवर्षा भांडारवार यांनी मानले. हा संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. सामाजिक सलोखा, बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
