राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
दुर्गम हेडरीत आधुनिक आरोग्यसेवेची ‘किमया’; वेदनारहित प्रसूतीसह ४०० व्या बाळाचा सुरक्षित जन्म
एलकेएएम रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी; आदिवासी भागातील मातांना मिळाला नवा दिलासा
अहेरी/गडचिरोली :
दुर्गम व आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता आधुनिक आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू होताना दिसत आहे. अहेरी तालुक्यातील हेदरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिली ‘वेदनारहित सामान्य प्रसूती’ यशस्वीरीत्या पार पाडत आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. याचबरोबर रुग्णालयाने ४०० व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा ऐतिहासिक टप्पाही गाठला आहे.
ग्रामीण भागात प्रसूतीदरम्यान महिलांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. मात्र एलकेएएम रुग्णालयाने ‘एपिड्युरल अॅनेस्थेशिया’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेदनारहित प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेमुळे प्रसूतीच्या कळा कमी जाणवतात, मात्र माता पूर्णपणे शुद्धीवर राहते. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरीत्या पार पडली.
या प्रसूतीदरम्यान ‘वाय-फाय सक्षम सीटीजी मॉनिटरिंग’ तसेच ‘डिलेयड कॉर्ड क्लॅम्पिंग’ यांसारख्या आधुनिक आणि सुरक्षित वैद्यकीय पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यामुळे माता आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, गार्डेवाडा येथील १९ वर्षीय सविता टोप्पो या गर्भवती महिलेला उच्च-जोखीम गर्भधारणा असल्यामुळे गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तातडीने एलकेएएम रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांच्या तज्ज्ञ पथकाने तत्काळ उपचार सुरू करून १५ एप्रिल २०२६ रोजी तिच्या बाळाचा सुरक्षित जन्म घडवून आणला. हा जन्म रुग्णालयातील ४०० वा सुरक्षित प्रसूतीचा टप्पा ठरला.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या ‘सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून हे रुग्णालय उभारण्यात आले असून लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्ती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील नागरिकांना मोफत आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्याचे कार्य सुरू आहे.
हेदरीसारख्या दुर्गम भागात वेदनारहित प्रसूतीसारखी सुविधा उपलब्ध झाल्याने अहेरी, एटापल्ली आणि भामरागड परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आदिवासी भागातील मातृत्व सेवेला या निमित्ताने नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.
