राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
“मावा नार मावा शाळा” उपक्रमाला एटापल्लीत जोरदार सुरुवात; 100 दिवसांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचा संकल्प!
केंद्रस्तरीय तीन दिवसीय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 300 हून अधिक शिक्षक-प्रेरिका सहभागी
एटापल्ली, दि. 4 मे 2026 (प्रतिनिधी):
जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “मावा नार मावा शाळा” या अभिनव शैक्षणिक उपक्रमाची एटापल्ली तालुक्यात उत्साहात सुरुवात झाली आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 मधील उन्हाळी सुट्ट्यांचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील गुणवत्ता वाढविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
मा. सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 100 दिवसांचा विशेष अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गडचिरोली, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.
गट साधन केंद्र, पंचायत समिती एटापल्ली येथे मा. ऋषिकेश बुरडकर, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रस्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला. दिनांक 4 मेपासून तालुक्यातील सर्व केंद्रांवर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून, एकूण 303 प्रेरिका व केंद्रस्तरीय शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षणादरम्यान प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे विभागीय समन्वयक साईनाथ सलाम तसेच भामरागड येथील शिक्षणमित्र प्रकाश उसेंडी यांनी गेदा केंद्राला भेट देत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. गेदा केंद्रात आयोजित सत्रात 27 शिक्षक व 30 प्रेरिका उपस्थित होते.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक व प्रेरिकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी अध्यापन पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. “मावा नार मावा शाळा” उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
