
पोलिसांच्या मदतीने मुलाला त्याच्या घरी सुखरूप पोहचविण्यात आले.
चंद्रपूर:- कुंभमेळ्याला गेलेल्या एका बापलेकासोबत काही गुंडांनी अनन्वित छळ केला. या छळाला कंटाळून बापाने मुलासमोरच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.१३) उघडकीस आली. वाराणसी पोलिसांनी चिमूर पोलिस ठाण्यात बापाच्या मुत्यूची माहिती दिली आणि दीड महिन्यांनी मुलाला त्याच्या घरी सुखरूप पोहचविण्यात आले. त्यांनतर कुटुंबियांची दीड महिन्यांपासून सुरू असलेली शोध मोहीम थांबली.
चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील मोरेश्वर आनंदराव सोनवाने (वय ४५) आणि त्यांचा ११ वर्षाचा मुलगा सागर याच्याबरोबर २४ फेब्रुवारीला प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला घरी कुणालाही न सांगता निघून गेले होते. त्यांनी गोंदिया येथून रेल्वेने कुंभमेळ्याच्या प्रवासाला सुरूवात केली. येथून समाजव्यवस्थेतील समाजकंटकानी त्यांचा अनन्वित छळ सुरू केला. बापलेकाचा प्रवास सरू असताना जबलपूरसमोर अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग लांबविली. त्याचे सर्वच पैसे व साहित्य चोरीला गेले. मात्र कुंभमेळ्याचा प्रवास सुरूच राहिला आणि दोघेही जैसे थे स्थितीमध्ये कुंभमेळ्यात पोहचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर गंगा नदीमध्ये शाही स्नान करून दुसऱ्या तिरावर पोहचले. मात्र सर्व साहित्य चौरीस सर्व गेल्याने मोरेश्वर यांनी मुलाच्या कानातील सोन्याची बारी विकून ३ हजार रूपये मिळविले. यातूनच पुढचा प्रवास करण्याचा विचार केला, परंतु त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचे पैसे व मोबाईल हिसावून घेतला. या प्रसंगामुळे बापलेक दोघेही आर्थिक संकटात सापडले.
जवळ पैसे नसल्याने बाप-लेकांनी ४३ दिवस वाराणशीच्या रस्त्यावरच आपले दिवस घालविले. रात्र झाली की कुठेही उघड्यावर झोपायचे. कुणी देईल ते अन्न खायचे असा त्यांचा ४३ दिवस दिनक्रम सुरू होता. दुर्दैवी जगण्यामुळे बापाचे मानसिक संतुलन बिघडले व त्याने मुलाच्या समोरच वाराणशीमध्ये महामार्गावरील एका झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. याची माहिती मुलाने वाराणसी पोलिसांना दिली. त्यानंतर वाराणसी पोलिसांनी याची माहिती चिमूर पोलिसांना दिली. व मुलगा सुखरूप असल्याचे त्यांनी चिमूर पोलिसांना सांगितले. वडिलांवर वाराणसी नदीघाटावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुलगा सागरला घेऊन पोलिस मोटेगावात त्याच्या घरी परतले. मोरेश्वर सोनवाने यांच्या मृत्यूमुळे मोटेगाव परिसरात शोककळा पसरली आहे