राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
पोलीस स्टेशन एटापल्ली येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
एटापल्ली, दि. १ मे : पोलीस स्टेशन एटापल्ली येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि देशभक्तीच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तिरंगा ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.
यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे, महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर तसेच प्रतीक्षा वणवे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर उपस्थित जिल्हा पोलीस दल, एसआरपीएफचे जवान तसेच एटापल्ली येथील नागरिकांना प्रभारी अधिकारी मडावी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली, तर सांगता राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पोलीस दल आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
