“लोहारडोंगरी वाचवा, चंद्रपूर वाचवा” आंदोलनाला माकपाचा जाहीर पाठिंबा
पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडुभाऊ धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
चंद्रपूर / प्रतिनिधी :
लोहारडोंगरी खाण प्रकल्पाच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडुभाऊ धोतरे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा) गडचिरोली जिल्हा समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माकपा जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकार उद्योगपती व कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी सर्व कायदे मोडून काम करत असल्याचा गंभीर आरोप माकपाने केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायदा आणि वनकायदा डावलून मोठ्या प्रमाणावर खाण प्रकल्पांना परवानगी दिली जात असल्याने स्थानिक जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातही लोहारडोंगरी खाण प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू असल्याचे माकपाने म्हटले आहे.
या खाण प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होण्याची शक्यता असून वन्यजीवांच्या अधिवासात मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढून सामान्य नागरिकांवर गंभीर संकट ओढवू शकते, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
या सर्व बाबी माहित असूनही सरकारकडून खाण प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने हा निर्णय म्हणजे कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी जनतेचा बळी देण्यासारखा असल्याची टीका माकपाने केली आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध करत माकपाने बंडुभाऊ धोतरे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
