गुरुपल्ली ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम : महिला दिनी नवजात बालिकेचे औक्षण करून स्वागत
बेबी किट व पाळणा भेट देऊन सन्मान; मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक संदेश
एटापल्ली :
मुलींच्या जन्माकडे समाजाने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे तसेच स्त्री सन्मानाचा संदेश सर्वदूर पोहोचावा या उद्देशाने गुरुपल्ली ग्रामपंचायतीकडून जागतिक महिला दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावात नुकत्याच जन्मलेल्या बालिकेचे औक्षण करून तिचे स्वागत करण्यात आले तसेच तिला बेबी किट आणि पाळणा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुपल्ली येथील रहिवासी गोपीका रामदास गावडे व रामदास साई गावडे यांच्या घरी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी गोंडस मुलीचा जन्म झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत गुरुपल्लीच्या वतीने या नवजात बालिकेचे विशेष स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ८ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात बालिकेचे औक्षण करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच बालिकेच्या आई-वडिलांचाही गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान बालिकेसाठी आवश्यक असलेली बेबी किट आणि पाळणा भेटवस्तू म्हणून देण्यात आले. या किटमध्ये नवजात बाळाच्या आरोग्य व संगोपनासाठी उपयुक्त साहित्याचा समावेश करण्यात आला होता. मुलगी ही कुटुंबाचा तसेच समाजाचा अभिमान असून तिच्या जन्माचे स्वागत करण्याची सकारात्मक परंपरा समाजात रुजावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रम डॉ. आदिनाथ आंदले, गटविकास अधिकारी (BDO), एटापल्ली यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गावातील नागरिक, विविध बचत गटांच्या महिला, महिला आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना रुजविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
महिला बचत गटांच्या सदस्यांनीही मुलींच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त करत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महिला दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला.
ग्रामपंचायत गुरुपल्लीच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून मुलींबद्दल आदर, सन्मान आणि समानतेची भावना वाढविण्यासाठी असे उपक्रम पुढेही राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
