राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
अवैध सागवानासह ९.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाची मोठी कारवाई ; पिकअप वाहनासह सागवान चिराण ताब्यात
एटापल्ली, ३० एप्रिल : भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रातील नैनवाडी नियतक्षेत्रात अवैधरित्या मौल्यवान सागवानाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने मोठी कारवाई करत ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात सागवान चिराणासह पिकअप वाहनाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एटापल्ली वनपरिक्षेत्रातील मोठा वनभाग हा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत असल्याने छत्तीसगडमधील काही लाकूड व्यापारी स्थानिक नागरिकांना अल्प पैशांचे आमिष दाखवून अवैध वृक्षतोड व तस्करीस प्रवृत्त करतात. यापूर्वीही जिजावंडी येथे सेमल प्रजातीची, तसेच हेटळकसा व घनपाडी येथे सागवान तस्करीवर कारवाई करण्यात आली होती.
नैनवाडी वनरक्षक श्रीमती सुशिला आतला या नियमित गस्त घालत असताना CG-05-D-1307 क्रमांकाचे पिकअप वाहन नैनवाडीहून पाखांजूरच्या दिशेने जाताना दिसले. वाहनाची तपासणी केली असता त्यात १.२३३ घनमीटर सागवान चिराण वनोपज आढळून आला.
त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. कारवाईदरम्यान १ लाख ४५ हजार १४५ रुपयांचा सागवान चिराण व ८ लाख रुपयांचे पिकअप वाहन असा एकूण ९.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक शैलेष मीना व सहायक वनसंरक्षक डी. जी. रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एन. के. खोब्रागडे, वनपाल बि. डी. नागोसे, एस. एल. तोराम, के. डी. मडावी, पी. बी. सोयाम, ए. एस. उईके तसेच सर्व वनरक्षकांनी संयुक्तरित्या सहभाग घेतला.
