आष्टी ग्रामीण पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम
प्रवाशांसाठी खास पाणपोई सुरू ; शीतल पेयजल सेवेमुळे नागरिकांना दिलासा

चामोर्शी, दि. १ मे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रवासी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामीण पत्रकार संघ, आष्टी (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्या वतीने बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रवासी निवारा येथे खास पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवासी, नागरिक तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
उन्हाळ्याच्या कडाक्यात अनेक प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण भासते. ही गरज ओळखून ग्रामीण पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपत पाणपोईची उभारणी केली आहे. या ठिकाणी शीतल पेयजलाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना मोफत पाणी दिले जात आहे.
या सेवेमुळे बसस्थानक परिसरात थांबणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. “मानवतेची सेवा हीच खरी समाजसेवा” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पाणपोईचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर कुंदोजवार, पोद्दार, पराग गोनपल्लीवार, अनिल आलूरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक रॉय, उपाध्यक्ष अशोक खंडारे, सचिव सुधीर फरकाडे, कोषाध्यक्ष गणेश शिंगाडे, सदस्य संजय भोयर, भास्कर फरकडे, संदीप जोरगलवार यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शीतल पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त करत ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले. उन्हाळ्यात अशा सेवांची नितांत गरज असून या उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
