रिपब्लिकन पक्षाला पूर्ववैभव मिळवून देणार
पुनर्बाधणीसाठी सर्व गटांनी एकत्र यावे : बाळासाहेब खोब्रागडे
गडचिरोली, ३० एप्रिल : रिपब्लिकन पक्षाची नव्या जोमाने पुनर्बाधणी करून पक्षाला पूर्वीचे वैभव मिळवून देणे ही काळाची गरज आहे. वंचित, दलित, मागासवर्गीय, शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे संघटन पुन्हा मजबूत करण्यासाठी सर्व गटांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे यांनी केले.
येथील चांदेकर भवन येथे बुधवारी आयोजित ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. देसाईगंज येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
खोब्रागडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत रिपब्लिकन पक्षाने दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली देशातील दलित, शोषित, भूमिहीन व श्रमिकांसाठी मोठा लढा दिला. हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी पक्षाची नव्याने उभारणी होणे आवश्यक आहे.
पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रश्नांवर लढा उभारावा, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करावा आणि संघटना गावपातळीपर्यंत बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी वंचित घटकांचा प्रभावी आवाज बनण्यासाठी रिपब्लिकन पक्षातील विविध गटांचे एकत्रीकरण गरजेचे असल्याचे सांगितले. केंद्रीय उपाध्यक्ष अशोक निमगडे यांनी पक्षाच्या ऐतिहासिक आंदोलनांची आठवण करून देत ती नव्या ताकदीने पुढे नेण्याचे आवाहन केले.
प्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक टेंभरे, राजुभाऊ खोब्रागडे, विशाल अलोणे, अखिल भारतीय रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस खोब्रागडे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, विभागीय उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, विभागीय सचिव केशवराव समृतवार, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, जिल्हा युवा अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दादाजी धाकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना बाळासाहेब खोब्रागडे. व्यासपीठावर रोहिदास राऊत, अशोक निमगडे व अन्य मान्यवर.
