आष्टीत शिवजयंती उत्सवाचा जल्लोष; दोन दिवस विविध कार्यक्रमांनी वातावरण दुमदुमले
आष्टी | प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आष्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाला आष्टीकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देत गावभर जल्लोषाचे वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख राकेशभाऊ बेलसरे यांच्या हस्ते झाले, तर सहउद्घाटक म्हणून उपसरपंच सौ. रेश्माताई फुलझेले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परागभाऊ गोणपल्लीवार होते. यावेळी डॉ. रवीभाऊ बुर्लावर, दिलीप बारसागडे, सुरजभाऊ कुकुडकर, कपिलभाऊ पाल, संतोषभाऊ बारापात्रे, आनंदराव खरबनकर, सुधीर फरकडे, संदीप जोरगलवार, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी. रॉय यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण सालुरकर यांनी केले.
१८ फेब्रुवारी रोजी जयंतीचे औचित्य साधून पोलीस व इतर सेवेत कठोर परिश्रमाने रुजू झालेल्या युवकांचा तसेच विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व राज्य स्तरावर पदक मिळवलेल्या खेळाडूंचा शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवगीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली, तर गावजेवणाचीही व्यवस्था करण्यात आली.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून छत्रपती शिवाजी चौक ते हनुमान मंदिर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी चौकात भव्य शिव शोभायात्रा संपन्न झाली. महिला, पुरुष आणि बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी पाहायला मिळाला.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आष्टीचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, कार्यकर्ते तसेच पोलिस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समितीचे अध्यक्ष विनीत कलाक्षपवार, उपाध्यक्ष करण येलमुले, सचिव आशिष क्षिरसागर, कोषाध्यक्ष सुमित कुकुडकर, सहसचिव गणेश चौधरी यांच्यासह सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
