*कोरची येथे बालिकांसाठी द्वितीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ*
*आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उद्घाटन; आदिवासी विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात नवी संधी*
*कोरची:-* गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे बालिकांसाठी आयोजित द्वितीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आदिवासी विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांना उच्च स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे।
या कार्यक्रमाला नगर पंचायतचे नगरसेवक तथा काँग्रेस पक्ष कोरचीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सदरूद्दीन भामानी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक तसेच एसएमसी अध्यक्ष माणिकराव मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर १२ ते १८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले असून गडचिरोली जिल्ह्यातील सात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळांमधून प्रत्येकी तीन अशा निवडक विद्यार्थिनींचा सहभाग आहे. या विद्यार्थिनींना व्यावसायिक पातळीवरील क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येत असून भविष्यात त्या भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवतील, या उद्देशाने प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे।
या संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी ईएमआरएस कोरचीचे प्राचार्य धर्मेंद्र सिंह ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली असून एमटीपीएसएस स्टेट सोसायटीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरामध्ये विद्यार्थिनींना क्रिकेटच्या तांत्रिक बाबींसोबतच शिस्त, फिटनेस आणि संघभावना यांचेही मार्गदर्शन करण्यात येत आहे।
उद्घाटनप्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, एकलव्य शाळांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारे हे व्यासपीठ त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रीडा क्षेत्रातही या विद्यार्थिनींनी पुढे जाऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली।
कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थिनींना क्रीडेसोबतच शिस्त आणि समर्पणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग, आयोजक, पत्रकार तसेच कोरची ब्लॉकमधील सर्व मान्यवरांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले।
