शिक्षणाबरोबरच कला आणि प्रतिमभेमुळे जीवन फुलते
प्रा. धनंजय ढवळे
आष्टी: विद्यार्थ्यांना यश संपादन करायचं असेल तर परिस्थितीवर मात करून जिद्द आणि चिकाटीने सतत परिश्रम करत रहावे .त्याचे फळ नक्कीच मिळते .फक्त शैक्षणिक डिग्री असली म्हणजे व्यक्तीचा विकास होऊ शकतो असं नाही तर त्या व्यक्तिच्या अंगी असलेली कला आणि प्रतिभा यामुळेही व्यक्तीचा जीवन बदलू शकतो. त्यासाठी अंगी असलेले सुप्त गुण आणि प्रतिभेच्या सादरीकरणाने जीवन फुलते. कला कोणतीही असो त्यातून विकास साधता येऊ शकते. आणि नोकरी करूनही कला जोपासता येऊ शकते.परिस्थिती माणसाला घडवते पण त्याच माणसाला घडवते जो धडपडत असतो, संघर्ष करीत असतो. त्यासाठी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो. त्यामुळे एक लेखक कलावंत दिग्दर्शक आणि नाट्य निर्माता म्हणून अभिनयाची आवड असणाऱ्या तरुणांनी व तरुणींनी अभिनय क्षेत्रात किंवा नाट्य क्षेत्रात करिअर बनवावे असे प्रतिपादन झाडीपट्टी रंगभूमी येथील लोकप्रिय नाटककार, निर्माता , नाट्य कलावंत प्रा. धनंजय ढवळे यांनी केले. ते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागा द्वारा आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिरात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते .यावेळी ग्रामपंचायत सदस्य कपिल पाल,नाट्य कलावंत मोना भसारकर, नाट्यकलावंत अखिल भसारकर, गायक विठ्ठल बोरकुटे, विकास रोहणे, प्रा. डॉ. राजकुमार मुसणे,डॉ. भारत पांडे डॉ. रवी शास्त्रकार, प्रा.रवी गजभिये, प्रा ज्योती बोबाटे, प्रा.विजया बलकी आदी उपस्थित होते. सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या श्री .कपिल पाल यांनी विविध अनुभव विद्यार्थ्यांना सांगत व्यक्तिमत्व विकासाकरिता आवश्यक बाबी विषयी मार्गदर्शन केले. नाट्य कलावंत मोना भसारकर यांनी विद्यार्थ्यांना अभिनय हे क्षेत्र सुद्धा निवडल्यास करिअरच्या अनेक संधी असल्याचे सांगितले. अखिल भसारकर यांनी व्यक्तिमत्व विकासाकरिता भाषा, देहबोलीप्रमाणेच अपडेट असणे गरजेचे असल्याचे सांगितले. जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने सर्व नाट्य कलावंतांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा .राजकुमार मुसणे यांनी तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रा.भारत पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा .रवी गजभिये यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाकरिता सहकार्य केले.
