*“आपली हाक माझी साथ” उपक्रमातून नागरिकांच्या तक्रारींना मिळणार थेट न्याय – मंत्री संजय राठोड यांची जनतेला ग्वाही.*
जया लाभसेटवार
यवतमाळ
यवतमाळ:- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. संजयभाऊ राठोड यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि विविध मागण्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी “आपली हाक माझी साथ” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट संपर्क कार्यालयामार्फत मांडण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, तक्रारींवर जलद कार्यवाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.
मंत्री संजय राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, गेल्या बावीस वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे विकासकामांना गती मिळाली आहे. मंत्रीपदासोबत पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या समजून घेणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या अडचणी, सामाजिक प्रश्न, विकासकामांशी संबंधित मागण्या तसेच विविध निवेदनांचा तत्काळ पाठपुरावा करण्यासाठी विशेष संपर्क व्यवस्था उभारण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा निवेदने संबंधित संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन नोंदवावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तक्रारींची संगणकीय नोंदणी करण्यात येणार असून प्रत्येक अर्जाला स्वतंत्र क्रमांक दिला जाईल. त्यानंतर संबंधित विभाग, तालुका स्तरावरील अधिकारी तसेच आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय प्रशासनाच्या माध्यमातून तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. एखाद्या समस्येचे समाधान तात्काळ न झाल्यास संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी दिग्रस, दारव्हा, नेर आणि यवतमाळ येथे संपर्क कार्यालये सुरू करण्यात आली असून, सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना सेवा उपलब्ध राहणार आहे.
या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध होणार असून, प्रशासन आणि जनतेमधील संवाद अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
