राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
“मायेच्या उबेने चिमुकलीला नवे जीवन!”
आरोग्य पथकाच्या अथक प्रयत्नांना यश; मृत्यूच्या दारातून ‘ती’ची सुखरूप सुटका
मोहुर्लीतील कमी वजनाच्या नवजात बालिकेची प्रेरणादायी यशोगाथा
गडचिरोली प्रतिनिधी | मोहुर्ली
गडचिरोली तालुक्यातील मोहुर्ली गावात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीने, मायेच्या उबेने आणि आईच्या सकारात्मक प्रतिसादामुळे एका नवजात चिमुकलीने मृत्यूवर मात करत नवजीवन मिळवले आहे. केवळ १ किलो ४०० ग्रॅमपर्यंत घसरलेल्या त्या बालिकेचे वजन अवघ्या एका महिन्यात २ किलो ६५० ग्रॅमपर्यंत पोहोचले असून, ही घटना आरोग्य यंत्रणेच्या समर्पित कार्याची जिवंत साक्ष ठरली आहे.
२० वर्षीय पिंकी जाकेश मडावी यांची ही पहिलीच प्रसूती. ८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:४५ वाजता त्यांनी घरीच एका गोंडस कन्येला जन्म दिला. प्रसुती दाईमार्फत पार पडली; मात्र जन्मतःच बाळाचे वजन केवळ २ किलो होते. अशा स्थितीत बाळाला तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करणे गरजेचे होते, पण कुटुंबीयांनी पारंपारिक समजुतीमुळे उपचारांसाठी स्पष्ट नकार दिला.
प्रसूतीनंतर लगेच बाळाला अंघोळ घालण्यात आली आणि योग्य स्तनपानही मिळाले नाही. परिणामी, अवघ्या दोन दिवसांत बाळाचे वजन तब्बल ६०० ग्रॅमने घटून १ किलो ४०० ग्रॅमवर आले. चिमुकलीचा जीव अक्षरशः धोक्यात आला होता.
दि. १० एप्रिल रोजी डॉ. राकेश नागोसे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसह भेट देत बाळाला तातडीने रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला; मात्र कुटुंबीयांनी पुन्हा नकार दिला. या वेळी आरोग्य विभागाने हार न मानता घरालाच ‘छोटे रुग्णालय’ बनवण्याचा निर्धार केला.
आरोग्य सेविका श्रीमती दुर्वा, श्रीमती उसेंडी, आरोग्य सेवक श्री. राणा, गटप्रवर्तक श्रीमती गादेवार, अंगणवाडी सेविका आणि आशा ताई यांनी एकत्र येत दिवस-रात्र प्रयत्न सुरू केले. आशा ताई दिवसातून तीन वेळा भेट देत होत्या, तर आरोग्य कर्मचारी दररोज गृहभेट घेऊन बाळाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत होते.
मातेला प्रत्यक्ष कृतीतून KMC (कांगारू मदर केअर), निव्वळ स्तनपान आणि बाळाला सतत उबदार ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. बाळाला अंघोळ घालणे पूर्णपणे बंद करण्यात आले आणि ‘आईची ऊब’ हेच त्या चिमुकलीसाठी औषध ठरले.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण समुपदेशनामुळे आणि आईच्या सकारात्मक प्रतिसादामुळे परिस्थिती हळूहळू बदलू लागली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या चिमुकलीचे वजन दिवसेंदिवस वाढू लागले. अखेर १४ मे २०२६ रोजी त्या बालिकेचे वजन २ किलो ६५० ग्रॅमपर्यंत पोहोचले असून, ती आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.
“जेव्हा कुटुंबीयांनी उपचारांना नकार दिला, तेव्हा आमचा विश्वास डगमगला नाही. मातेच्या मनात विश्वास निर्माण केला आणि आज ते बाळ हसताना पाहून आमच्या सर्व कष्टाचे चीज झाले,” अशी भावना मोहुर्लीच्या आरोग्य पथकाने व्यक्त केली.
ही घटना केवळ एका बाळाच्या वजनवाढीची कथा नसून, ती आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चिकाटीची, मायेच्या उबेची आणि विज्ञानाधारित काळजीच्या विजयाची प्रेरणादायी यशोगाथा ठरली आहे.
“नवजात बालकाची योग्य काळजी, हीच उद्याची सुदृढ पिढी!”
— आरोग्य विभागाचा जनजागृती संदेश
