oplus_32
ग्रामसभेचा पुढाकार; पेरमिली परिसरात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात.
पेरमिली(गडचिरोली):- ग्रामसभेच्या पुढाकारातून अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरात तेंदूपत्ता संकलन हंगामाला उत्साहात सुरुवात झाली आहे. जंगलावर आधारित उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांसाठी तेंदूपत्ता संकलन हा महत्त्वाचा आर्थिक आधार मानला जातो. यंदा ग्रामसभेच्या नियोजनामुळे संकलन प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पेरमिली परिसरातील पेरमिली सह आलदंडी, चंद्रा (स), चंद्रा (म), कचलेर, हिनभट्टी गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी सुरुवात झाली आहे. स्थानिक ग्रामसभा, पेसा समिती आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. संकलकांना तेंदूपत्ता तोडणीचे नियम, गुणवत्तेनुसार पानांची निवड, सुरक्षितता आणि गठ्ठे तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उन्हाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे कमी असल्याने अनेक आदिवासी कुटुंबे तेंदूपत्ता संकलनाकडे रोजगाराचे साधन म्हणून पाहतात. विशेषतः महिला आणि युवकांचा या कामात मोठा सहभाग दिसून येतो. तेंदूपत्ता संकलनातून मिळणारे उत्पन्न घरगुती खर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी उपयोगी पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ग्रामसभेच्या माध्यमातून संकलन होत असल्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होऊन संकलकांना योग्य मोबदला मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, पारदर्शक व्यवहार आणि वेळेवर देयके मिळावीत यासाठी ग्रामसभेने विशेष नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक नागरिकांच्या मते, जंगलाशी संबंधित उपजीविकेच्या साधनांमध्ये तेंदूपत्ता हंगामाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पेक्षा या वर्षी तेंदू पानाला चांगले दर मिळाले आहे.
यंदाचा तेंदूपत्ता हंगाम आदिवासी बांधवांसाठी आर्थिक दिलासा देणारा ठरेल, अशी आशा पेरमिली परिसरातील आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.
