“सहकाऱ्याच्या लेकरासाठी संघटना धावली!”
गौतम निमसरकार यांच्या चिमुकली सियाच्या भविष्यासाठी २ लाखांची एलआयसी एफडी
मानवतेचा झरा अखंड वाहत असल्याचे संगणक परिचालक संघटनेने दाखवून दिले
चामोर्शी | तालुका प्रतिनिधी
स्वार्थाच्या विळख्यात अडकलेल्या आजच्या युगातही माणुसकीचा दिवा अजूनही तेवत असल्याचे हृदयस्पर्शी उदाहरण गडचिरोली जिल्ह्यात पाहायला मिळाले. सहकाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या चिमुकल्या मुलीच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना गडचिरोली जिल्हा अक्षरशः देवदूत बनून पुढे आली. संघटनेने कु. सिया गौतम निमसरकार हिच्या नावाने तब्बल २ लाख रुपयांची १२ वर्षांसाठी एलआयसी मुदत ठेव करून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
ग्रा.पं. अनखोडा येथे संगणक परिचालक म्हणून कार्यरत असलेले स्वर्गीय गौतम भाऊ निमसरकार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसर हळहळला होता. कुटुंबाचा आधार हरपल्यानंतर त्यांच्या पत्नी व लहान मुलगी सिया यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. विशेषतः सियाच्या शिक्षण आणि भविष्यासंदर्भात निर्माण झालेली चिंता पाहून संगणक परिचालक संघटनेने पुढाकार घेतला आणि एक ऐतिहासिक निर्णय घेत सियाच्या भवितव्यासाठी आर्थिक सुरक्षा उभी केली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः अनखोडा येथे जाऊन सियाच्या कुटुंबीयांकडे एलआयसी बाँड सुपूर्द केला. हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले तर सियाच्या कुटुंबीयांनी संघटनेप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. “आम्ही एकटे नाही,” अशी भावना या मदतीमुळे त्यांच्या मनात निर्माण झाली.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुकेश नामेवार, जिल्हाध्यक्ष संदीप बुरमवार, जिल्हा सचिव आशिष कंठीवार यांच्यासह चामोर्शी तालुक्यातील सर्व संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी स्व. गौतम निमसरकार यांच्या कार्याची आठवण काढत त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी संघटना कायम खंबीरपणे उभी राहील, असा शब्द दिला.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना जेव्हा एखाद्या सहकाऱ्याच्या लेकराच्या भवितव्यासाठी आईच्या मायेने उभी राहते, तेव्हा ती केवळ संघटना राहत नाही तर समाजासाठी प्रेरणादायी शक्ती बनते. गडचिरोली जिल्ह्यातील संगणक परिचालक संघटनेने केलेला हा उपक्रम आज अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
“माणुसकी अजून जिवंत आहे!”
सियाच्या भविष्यासाठी उचललेले हे पाऊल केवळ आर्थिक मदत नसून, एका चिमुकलीच्या आयुष्यात आशेचा नवा किरण ठरले आहे. समाजात अजूनही संवेदनशील माणसं आहेत, याची जाणीव करून देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
