गडचिरोलीच्या डॉक्टरांचा पराक्रम; मूत्राशयातील ४ इंचाचा ‘महाकाय’ मुतखडा यशस्वी शस्त्रक्रियेत बाहेर
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दाखवली वैद्यकीय कौशल्याची ताकद; वृद्ध रुग्णाला नवजीवन
गडचिरोली : वयाच्या ९४ व्या वर्षी लकव्याशी झुंज देणाऱ्या वृद्धाच्या मूत्राशयात तब्बल चार इंचाचा महाकाय मुतखडा आढळल्याने कुटुंबीयांसह डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी धाडसी आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करून हा दुर्मिळ मुतखडा यशस्वीपणे बाहेर काढत वृद्धाला अक्षरशः नवजीवन दिले आहे. या कामगिरीमुळे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तालुक्यातील पुलखल येथील सितकुरा धर्मा जराते (वय ९४) हे गेल्या वर्षभरापासून लकव्याच्या व्याधीने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांना लकव्याचा सौम्य झटका आल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना लघवीचा तीव्र त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी तत्काळ तपासण्या केल्या असता त्यांच्या मूत्राशयात तब्बल चार इंचाचा दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीचा मुतखडा असल्याचे स्पष्ट झाले.
वृद्धापकाळ, लकव्याचा आजार आणि शारीरिक अशक्तपणा यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक मानली जात होती. मात्र डॉक्टरांच्या टीमने आव्हान स्वीकारत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शस्त्रक्रिया पार पाडली. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर महाकाय मुतखडा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर वृद्ध रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकत डॉक्टरांचे आभार मानले. “वृद्ध वयात अशी शस्त्रक्रिया शक्य होईल, याची आशाच नव्हती,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
ही शस्त्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अविनाश टेकडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सर्जन डॉ. आतिश मेश्राम, डॉ. प्रसाद खंडारे, गणेश टी.ए., डॉ. प्रभाकरन व्ही., भूलतज्ज्ञ डॉ. नागसेन साखरे, ओटी इन्चार्ज कविता नांदगाये, परिचारिका शितल रामटेके, समीक्षा मडावी तसेच परिचर भास्कर नेवारे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डॉ. मनिष मेश्राम हेही उपस्थित होते.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या बळावर अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
