अप्पर–डिप्पर लाईट वापराबाबत जनजागृतीची मागणी
जड वाहनांच्या हाय बीममुळे अपघातांचा धोका वाढला; आरटीओंना निवेदन
चामोर्शी | तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गांवर रात्रीच्या वेळी धावणाऱ्या जड वाहन चालकांकडून अप्पर–डिप्पर लाईटचा योग्य वापर होत नसल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ट्रक, डंपर, टिप्पर, जेसीबी तसेच अन्य जड वाहनांच्या हाय बीम (अप्पर) लाईटच्या तीव्र प्रकाशामुळे समोरून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी चालकांचे डोळे दिपत असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.
यासंदर्भात चामोर्शी येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षक विजय कोमेरवार यांनी आरटीओ अधिकारी अशोक जाधव यांना निवेदन सादर करून जड वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी केली आहे. वाहन क्रॉसिंगच्या वेळी चालकांनी डिप्पर (लो बीम) लाईटचा वापर करावा, यासाठी परिवहन विभागामार्फत विशेष सूचना देण्यात याव्यात तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली आहे. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने अप्पर–डिप्पर लाईट वापराबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि वाहन चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाल्यास रात्री होणाऱ्या अपघातांमध्ये निश्चितच घट होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
