१२ तासांत खुनाचा उलगडा ; गडचिरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
तांत्रिक पुरावे अन् गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद ; चंद्रपुरातून मुख्य आरोपीला पकडले
स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलिसांची संयुक्त मोहीम यशस्वी
गडचिरोली : मौजा मेंढा येथे घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत गडचिरोली पोलिसांनी दोन आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे. तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि वेगवान तपासाच्या बळावर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत गंभीर गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
दिनांक ८ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मौजा मेंढा, ता. गडचिरोली येथे अक्षय भानारकर यांच्या राहत्या घरी शामकला सुखदेव किरंगे (रा. हिडदा, ता. कुरखेडा) हिचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात अप. क्र. ५७८/२०२६ कलम १०३ भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाला वेग देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस स्टेशनचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
तपास पथकांनी वेगाने हालचाली करत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सुदामा रामभाऊ चौधरी याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पूर्ववैमनस्यातून शामकला किरंगे हिचा खून केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपी सुदामा रामभाऊ चौधरी (वय ३३, रा. शिरसगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि चेतन धर्माराव खोब्रागडे (रा. इंदिरानगर, गडचिरोली) यांना अटक केली. तसेच एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून बालकाला बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. अतुल तराळे करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, गडचिरोलीचे पोनि. विनोद चव्हाण, पोउपनि. शिवाजी देशमुख, पोउपनि. माधुरी मिसाळ, पोउपनि. भावना राऊत तसेच अंमलदारांनी पार पाडली.
गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावून आरोपींना जेरबंद करणाऱ्या तपास पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
