म. ज्योतिबा फुले हायस्कूल, आष्टीचा 90.90% निकाल; यशाची उज्ज्वल परंपरा कायम!
अंकित बावणे ठरला शाळेत प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव
भास्कर फरकडे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या एसएससी परीक्षेच्या निकालात आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत 90.90 टक्के निकालाची दमदार नोंद केली आहे. विद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या परीक्षेत अंकित वाशिक बावणे याने 88.20 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तर कु. अनुक्षा किशोर राऊत हिने 86 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. स्नेहल रविकुमार बुगावार हिने 84.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 88 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 17 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी तर 23 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यालयाने निकालाच्या टक्केवारीचा वाढता आलेख कायम ठेवत गुणवत्तेची परंपरा जपली आहे.
या यशाबद्दल वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरीचे सचिव बबलूभैया हकीम तसेच त्यांच्या सहचारिणी शाहीनभाभी हकीम यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यालयाचे प्राचार्य किशोर पाचभाई, पर्यवेक्षक घाटबांधे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य किशोर पाचभाई व सहकारी शिक्षकांनी शाळेत प्रथम आलेल्या अंकित वाशिक बावणे यांच्या घरी भेट देऊन त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्याच्या पालकांचेही अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन अन् मेहनतीची जोड
विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हा यशाचा टक्का गाठता आल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.
