गरजूंना दिला जीवनदानाचा हात!
रक्तदान करून नगरसेवक राघवेंद्र सुलवावार यांनी जपली सामाजिक बांधिलकी
📍 एटापल्ली | प्रतिनिधी
“रक्तदान हेच श्रेष्ठदान” या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा एटापल्ली येथे आला. एटापल्ली नगर पंचायतचे नगरसेवक तथा समर्पण ट्रस्ट एटापल्लीचे अध्यक्ष राघवेंद्र सुलवावार यांनी सहकाऱ्यांसह रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
लॉयड्सच्या काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सुमित्रा बिश्वास (मु. येमली, पो. बुर्गी, ता. एटापल्ली) यांना तातडीने रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच राघवेंद्र सुलवावार यांनी तत्काळ पुढाकार घेत अहेरी उपजिल्हा रुग्णालय गाठले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी स्वतः रक्तदान केले तसेच आपल्या सहकाऱ्यांनाही रक्तदानासाठी प्रेरित केले.
यावेळी आशिष बक्षी, व्यंकटेश गड्डमवार, मनोज बेपारी आणि साधन मिस्त्री यांनीही रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडविले. सर्व रक्तदात्यांच्या तत्परतेमुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळाला असून उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
समर्पण ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या राघवेंद्र सुलवावार यांच्या या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
यावेळी बोलताना राघवेंद्र सुलवावार म्हणाले, “रक्तदान हेच श्रेष्ठदान असून प्रत्येकाने सामाजिक जाणीव ठेवून गरजू रुग्णांसाठी पुढे यावे. एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.”
या मानवतावादी उपक्रमामुळे एटापल्ली परिसरात रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून नागरिकांकडून रक्तदात्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
