*घरकुलधारकांचा आक्रोश; मोफत रेतीअभावी बांधकाम ठप्प!*
*शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तहसीलदारांना निवेदन; रेती घाट तातडीने सुरू करण्याची मागणी*
भास्कर फरकडे | चामोर्शी प्रतिनिधी
चामोर्शी : तालुक्यातील घरकुलधारकांना मोफत रेती उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे घरकुल बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले असून, शासनाने बंद असलेले रेती घाट तात्काळ सुरू करून लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शीच्या वतीने तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
चामोर्शी तालुक्यात ग्रामीण भागासह शहरात एकूण ३४१ घरकुल मंजूर झाले आहेत. घरकुल बांधकामासाठी लागणारे रेती, गिट्टी, विटा, सिमेंट आदी साहित्य अनेक लाभार्थ्यांनी जागेच्या कमतरतेमुळे टप्प्याटप्प्याने खरेदी करून वापरले. अनेक घरकुलधारकांकडे साहित्य साठवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आवश्यकतेनुसार रेती टाकण्यात येत होती. मात्र, सध्या मोफत रेती घाट बंद असल्यामुळे बांधकामासाठी आवश्यक रेती उपलब्ध होत नसून अनेक लाभार्थ्यांचे काम ठप्प झाले आहे.
यामुळे घरकुल पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना खासगी विक्रेत्यांकडून जादा दराने रेती खरेदी करावी लागत असून आर्थिक भार वाढला आहे. शासनाने याची तात्काळ दखल घेऊन रेती घाट सुरू करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विक्की वालदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे गटप्रमुख सुरज नैताम, आरोग्यदूत सत्यवान पिपरे, सदस्य निखिल सातपुते, सामाजिक कार्यकर्ते पंकज पेशट्टीवार तसेच घरकुलधारक प्रभाकर मेश्राम, राहुल बुरांडे, नागोबा गव्हारे, प्रभुधर नैताम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*“लवकरच रेती घाट सुरू करण्यात येतील”*
घरकुलधारकांची अडचण लक्षात घेता रेती उपलब्धतेबाबत सकारात्मक निर्णय घेत लवकरच रेती घाट सुरू करण्यात येतील, असे आश्वासन तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती देण्यात आली.
