राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
वादळाच्या तडाख्यात झाड कोसळले; युवकांनी दाखवली ‘मर्द मराठ्यांची’ तत्परता!
एटापल्लीत मध्यरात्री धावली मदतीची साखळी; नगरसेवक राघव सुलवावार घटनास्थळी दाखल
📍 एटापल्ली | प्रतिनिधी
एटापल्ली शहरात शनिवारी रात्री आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. हनुमान मंदिर परिसरातील सचिन गड्डमवार यांच्या घरासमोर रस्त्यावर तसेच विद्युत तारांवर मोठे झाड कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संकटसमयी काही धाडसी युवकांनी पुढाकार घेत तातडीने मदतकार्य सुरू करत नागरिकांना मोठा दिलासा दिला.
दि. १६ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास आलेल्या वादळामुळे हे झाड अचानक कोसळले. घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे यांनी नगरसेवक राघव सुलवावार यांना संपर्क साधला. माहिती मिळताच राघव सुलवावार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक मदतकार्याला सुरुवात केली.
दरम्यान, शहरातील विविध भागांत झाडे कोसळल्याने महावितरणचे कर्मचारी इतर ठिकाणी व्यस्त होते. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अशा वेळी एटापल्लीतील युवक पंकज दंडिकवार यांनी धाडस दाखवत स्वतः कुर्हाड हातात घेत रस्त्यावर व विद्युत तारांवर पडलेल्या झाडाच्या फांद्या हटवण्याचे काम सुरू केले. त्यांच्या मदतीला चेतन गड्डमवार, ओमकार मोहुर्ले आणि विनोदजी मोतकुरवार हे युवकही तत्परतेने धावून आले.
या युवकांनी जीवाची पर्वा न करता रस्ता मोकळा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. संकटाच्या प्रसंगी समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि सेवाभाव या युवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी मोहन नामेवार तसेच नगरसेवक राघव सुलवावार उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी युवकांच्या धाडसी कार्याचे अभिनंदन करत प्रशासनाने अशा युवकांचा सन्मान करावा, अशी मागणीही व्यक्त केली.
