राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
उन्हाच्या तडाख्यात ‘गारवा’ ठरली गर्देवाडा पोलीसांची पाणपोई!
गडचिरोली पोलीस दलाचा मानवतेचा उपक्रम; प्रवासी व नागरिकांना दिलासा
📍 गर्देवाडा प्रतिनिधी
वाढत्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिकांचे हाल होत असताना गडचिरोली पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोली पोलीस दल अंतर्गत पोलीस मदत केंद्र गर्देवाडा यांच्या पुढाकारातून नागरिकांसाठी पाणपोईची सुविधा सुरू करण्यात आली असून या उपक्रमाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.
सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने रोडने प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक, वाटसरू तसेच स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस मदत केंद्र गर्देवाडा येथे शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या पाणपोईमुळे उन्हाच्या कडाक्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून, “पोलीस केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे मित्र आहेत,” याची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा आली आहे.
विशेष म्हणजे, पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी या सामाजिक कार्याचे स्वागत केले आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही पाणपोई प्रवाशांसाठी ‘जीवनदायी आधार’ ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
सामाजिक हित जपत नागरिकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त होत असून, गडचिरोली पोलीस दलाच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
