महागावात सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व सप्तरंगी ध्वजारोहण; सामूहिक विवाह सोहळा उत्साहात
चार जोडप्यांचा एकाच मंडपात विवाह — काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन
📍 अहेरी | महागाव
अहेरी तालुक्यातील महागाव येथे सल्ला गांगरा शक्ती कॅम्पमध्ये सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण, सप्तरंगी ध्वजारोहण आणि सामूहिक विवाह सोहळा गावकरी व आदिवासी बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते झाले. सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून सुनीता कूसनाके व सुरेखा आलम यांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमादरम्यान अजय कंकडालवार यांचे आदिवासी परंपरेनुसार नृत्य व स्वागत करण्यात आले. मंडळ व ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला.
या प्रसंगी चार जोडप्यांचा एकाच मंडपात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. नवदांपत्यांना अजय कंकडालवार यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन शुभ आशीर्वाद देण्यात आले.
कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, ग्रामस्थ आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
