राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
पंचायत समिती कार्यालयात नागाचा थरार; समर्पण ट्रस्टच्या सर्पमित्रांनी वाचविले जीव!
प्रशिक्षणाचे यश! धाडसी युवकांनी सुरक्षित केले नागाचे रेस्क्यू
एटापल्ली : पंचायत समिती कार्यालय परिसरात अचानक नाग साप आढळल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. कार्यालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना समर्पण ट्रस्ट एटापल्लीच्या प्रशिक्षित सर्पमित्रांनी धाडसी कामगिरी करत नाग सापाचे यशस्वी रेस्क्यू केले.
संकेत फुलमाळी यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर सर्पमित्र शशांक नामेवार, तेजस गुज्जलवार व अनिकेत मामीडवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने नाग सापाला पकडून कोणतीही इजा न करता कृष्णार रोड परिसरातील जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.
या रेस्क्यू मोहिमेदरम्यान समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष राघवेंद्र सुलवावार तसेच सदस्य संपत पैडाकुलवार उपस्थित होते. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याने कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्त करत युवकांचे कौतुक केले.
विशेष म्हणजे, मागील वर्षी समर्पण ट्रस्ट एटापल्लीतर्फे प्रशिक्षक श्रीकांत नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सर्पमित्र प्रशिक्षण शिबिराचे हे उल्लेखनीय फलित मानले जात आहे. या प्रशिक्षणातून तयार झालेले युवक आज निःशुल्क नागरिकांच्या मदतीला धावून जात वन्यजीव संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.
यावेळी अध्यक्ष राघवेंद्र सुलवावार म्हणाले, “सर्पमित्रांचे कार्य हे केवळ साप पकडण्यापुरते मर्यादित नसून नागरिकांचे प्राण वाचविण्यासोबतच वन्यजीव संरक्षणाचे मोठे सामाजिक कार्य आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या युवकांचा आम्हाला अभिमान आहे.”
समर्पण ट्रस्ट एटापल्लीचे पदाधिकारी राघवेंद्र सुलवावार (अध्यक्ष), राहुल कुळमेथे (उपाध्यक्ष), अमोल गजाडीवार (सचिव), रोहित बोमकंटीवार (सहसचिव), सूरज मंडल (कोषाध्यक्ष), संपत पैडाकुलवार, अंकित दीकोंडावार व संतोष गंदेशिरवार (सदस्य) हे सामाजिक, पर्यावरणीय व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवत असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
