पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याणाचा उपक्रम; मोफत आरोग्य अभियानाचे आयोजन.
जया लाभसेटवार
उपसंपादिका
यवतमाळ.
दारव्हा(यवतमाळ): – राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दारव्हा येथे २१ जून रोजी भव्य मोफत आरोग्य महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. माँ आरोग्य सेवा समिती, यवतमाळ आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
२१ जून रोजी (रविवारी) सकाळी १० ते दुपारी २ वाजेदरम्यान के. विरजी भीमजी घेरवारा हायस्कूल, दारव्हा येथे हे शिबिर पार पडणार असून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये हृदयरोग, कर्करोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, बालरोग, दंतविकार तसेच मूत्रपिंडाशी संबंधित आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार पुढील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शनही दिले जाणार आहे. तसेच ईसीजी, मॅमोग्राफी, किडनी तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. गंभीर रुग्णांवर सावंगी (मेघे) येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून रुग्णांच्या प्रवास, निवास, भोजन आणि औषधोपचाराची संपूर्ण व्यवस्था विनामूल्य करण्यात येणार आहे.
याशिवाय आयुष्मान भारत कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. लाभार्थींनी आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दारव्हा, दिग्रस, नेर आणि परिसरातील नागरिकांनी या आरोग्य महाअभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
